माणसांच्या देशा !
१.
सिग्नलला गाडी थांबली… एवढी गर्दीची वेळ असूनही आज साधं चिटपाखरूही नव्हतं रस्त्यावर… तुरळक गाड्या दिसत होत्या… ट्रॅफिक पोलिसाने हटकून विचारलंच… एअरपोर्टवरून आलोय म्हटल्यावर तो मागे हटला आणि म्हणाला, हाफ लॉकडाऊन आहे , थेट घरीच जा आणि घरीच राहा साहेब.
त्याने मान डोलावली, म्हणाला, मी बेजबाबदार देशातला जबाबदार नागरिक आहे. कारण मी सतत परदेशांत जात-येत असतो. मला नीट माहिती आहे हा भयंकर आजार कसा पसरू शकतो ते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे स्वतंत्र खोलीही आहे क्वारंटाइन करून घेण्यासाठी.
पुढच्या सिग्नलला त्याचं लक्ष रस्त्याकडेच्या झोपड्याकडे गेलं… मलूल प्रकाशात त्याहून मलूल चेहऱ्याने बसलेलं कुटुंब पाहून त्याला भडभडून आलं… एरवी त्याला ‘ही गलिच्छ माणसं शहरं विद्रूप करतात,’ असं वाटून किळस यायची… आज त्यांना पाहू मात्र त्याच्या मनात कणव दाटून आली… इथून पुढच्या काही दिवसांत पूर्ण लाॅकडाऊन घोषित होईल आणि मग यांचं काय होईल? यांना भीक घालायलाही रस्त्यावर कोणी असणार नाही…
त्याने काच खाली केली, भिकाऱ्यांच्या कुटुंबप्रमुखाला खुणेने बोलावलं… हाताला लागलेली पाचशेची नोट त्याने सरळ त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवली… भिकाऱ्याचे डोळे पाण्याने डबडबले… आपल्या गाडीत आज किती दयाळू माणूस बसलेला आहे, या कल्पनेने उबरचालकही सद्गतित झाला…
…थोड्या वेळापूर्वीच परदेशातून आलेला माणूस बंद कारमध्ये खोकला होता… जबाबदार नागरिक असल्याने त्याने खोकताना तोंडावर हात धरला होता… मात्र, त्याच हाताने त्याने भिकाऱ्याला पाचशे रुपये दिले होते, त्याच हाताने तो कॅबचालकालाही दीडशे रुपयांचं बिल झालेलं असताना दोनशे रुपयांची नोट देणार होता… 'कीप द चेंज' असं म्हणणार होता…
…आजवर पाचशेची नोट केवळ सिनेमातच पाहिलेल्या भिकाऱ्याला आणि कॅबचालकाला नेमकी काय भेट मिळाली आहे, हे १४ दिवसांनी कळणार होतं… कुठून मिळाली आहे, हे त्यांना कधीच कळणार नव्हतं… त्यांच्याकडून ती ज्यांना मिळणार होती, त्यांना तरी कुठे कळणार होतं?…
****
२.
हवालदार भोसलेंनी घर सोडल्याला ४८ तास उलटून गेले होते, अजून किती वेळाने घरी जायला मिळेल याची काही कल्पना नाही… श्रेयसचा दहावीचा सेकंडलास्ट पेपर , त्याला पेपर ला सोडायला परीक्षेच्या केंद्रावर गेले,त्याला वर्गात सोडलं आणि साहेबांचा फोन आला, वरून काहीतरी अर्जंट ऑर्डर आली होती म्हणे, पोलीस स्टेशनला जावं लागणार होतं. तडक घरी जाऊन बिना इस्त्रीचा युनिफॉर्म तसाच घालून हवालदार स्टेशनवर पोहोचले. घाईघाईने नेमक्या बीपीच्या गोळ्या घ्यायला विसरले, १४४ कलम लागलंय एवढंच माहिती होतं… रस्त्यात बाहेर पडणाऱ्यांना ‘घरात राहा रे बाबांनो’ अशी हात जोडून विनंती करत होते ते. नंतर चक्रं फिरली आणि संचारबंदी जाहीर झाली तशी त्यांना काठी काढावी लागली… खुद्द गृहमंत्र्यांनीच काठीला तेल लावून ती वापरा, असं सांगितल्यावर त्यांचाही नाईलाज होता… पोलिसी नजर होती, खरोखरच कामाला कोण निघालाय, हे त्यांना अंदाजाने कळायचं, निव्वळ टाइमपासला निघालेली पोरंही समजायची आणि मग त्यांच्या दंडुक्याचे रट्टे त्या पोरांच्या ढुंगणावर पडायचे…
फारतर दीडेक दिवसांनी घरी जाऊ अशा समजुतीने डयुटीवर आलेल्या भोसल्यांच्या लक्षात आलं की आता दोनतीन दिवस तरी सुटका नाही… त्यांना नीट चहा आणि वडापाव मिळत नव्हता, जेवण कुठून मिळणार… त्यात पब्लिक सार्वजनिक सुटी असल्यासारखी बाहेर पडत होती… जीवनावश्यक वस्तू सतत मिळत राहतील हे सांगून मुख्यमंत्री थकले तरी लोक आता कधीच काही मिळणार नसल्यासारखे धावत होते…
झोपेचा अभाव, जेवण्याखाण्याची आबाळ, कुटुंबापासून दूर राहिल्याची चिडचीड आणि थकवा यांनी त्रासलेल्या भोसल्यांना मोटरसायकलवरून घाईघाईने निघालेला माणूस दिसला आणि त्यांच्या कपाळाची शीर तडतडली… त्यांनी मोटरसायकलीला आडवे जात थांबण्याचा इशारा केला, मोटरसायकल कडेला भेलकांडली तेव्हा पुढे होऊन सटासट रट्टे ओढायला सुरुवात केली… तो माणूस काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार होता, पण पोलिसी दंडुक्याचा एक रट्टा पडताच त्याची जीभ तोंडातच गोठून गेली… कसाबसा तो उलटा पळाला…
तेवढ्यात भोसल्यांच्या मागून एक कार आली… ड्रायव्हरच्या मागे नियमाप्रमाणे एक पॅसेंजर बसला होता… रूबाबदार, नीटनेटका… कारवर मेडिकल क्राॅसची खूण होती… भोसल्यांनी खूण करताच काच खाली करून ड्रायव्हर म्हणाला, डाॅक्टरसाहेब अर्जंट आॅपरेशनसाठी निघाले आहेत…
…या भयंकर महामारीच्या काळात निम्याहून अधिक डाॅक्टरांनी दवाखाने बंद केलेले असताना काही डाॅक्टर देवदूतासारखे धावून जातात, हे कळल्याने भोसले सद्गतित झाले… त्यांनी हात वर करून अभिवादन केलं…
…मोटरसायकल सोडून पळालेला डाॅक्टर मनोमन स्वत:ला शिव्यांची लाखोली वाहात होता… आरोग्यमंत्र्यांचं आवाहन मनावर घेऊन क्लिनिक उघडायला जाण्याची दुर्बुद्धी आपल्याला कशी झाली, असं त्याला वाटत होतं… दुसरीकडे भरधाव सुटलेल्या कारमधल्या ‘डाॅक्टर’ने सुटकेचा नि:श्वास सोडला… त्याच्या डिकीत सिगरेट, दारू, मावे, गुटखे,ड्रग्ज, अशी परिचितांमध्ये गुपचूप दामदुप्पट भावाने विकण्यासाठीची जीवनावश्यक ‘औषधं’ होती… हवालदाराने तपासलं असतं, तर काही खरं नव्हतं… ड्रायव्हर बनलेल्या मित्राला काचेवर चिकटपट्ट्या लावून डाॅक्टरच्या गाडीचा भास निर्माण करण्याची भारी आयडिया सुचली, याचं त्याला फार कौतुक वाटलं…
****
३.
मनोज युनिटमध्ये हताश होऊन बसला होता,खरं तर शिफ्ट संपवून कामगार घरीही गेले होते, हा मात्र अजूनही तिथेच होता, त्याच्या डोळ्यात अश्रू आणि चिंता दाटून आली होती, चांगल्या मार्क्स मिळवून साताऱ्यातल्या एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयातुन तो मेकॅनिकल इंजिनियर झाला, मोठ्या पगाराची नोकरी चालून आलेली असताना सुद्धा त्याने स्वतःचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. पण गेले काही दिवस त्याचं बरं चाललं नव्हतं, आर्थिक मंदी आल्यापासून तर त्याचं कंबरडंच मोडलं, मगाशीच MSEB मधून त्याला फोन येऊन गेलेला, कंपनीचं 2 महिन्यांचं लाईटबिल थकलं होतं,अधिकारी तावातावात बोलत होता,वीज कापण्याची भाषा करत होता. त्याने कशीबशी अधिकाऱ्याची विनवणी करून पुढच्या महिन्याची मुदत मागून घेतली. हे जर असंच चालत राहिलं तर कामगारांचे पगार सुद्धा आपण भागवू शकणार नाही या कल्पनेनंच त्याला रडू कोसळलं.. तेवढ्यात त्याचा फोन खणाणला,पलीकडून प्रज्वल बोलला, कलेक्टर साहेबांनी अर्जंट बोलवलं आहे ,असशील तसा तडक कलेक्टर ऑफिसला ये, मोठी ऑर्डर आहे. मनोज MIDC मधून लगेच गाडी काढून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला, जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल सांगितलं आणि ताबडतोब 1 लाख मास्क बनवण्याचं काँट्रॅक्ट त्यांना दिलं..
अवघ्या काही क्षणांपूर्वी दुःखी असलेला मनोज आता आनंदी होऊन नव्या उमेदीने जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत होता, त्याच्या निस्वार्थी प्रयत्नांना आज यश येत होतं, कॉलेज वयात त्याने पाहिलेल्या स्वप्नाला आज पालवी फुटत होती, एक नवी पहाट, नव्या आकांक्षा घेऊन नव्या आव्हानांच्या दुनियेत भरारी घ्यायला सज्ज झाला होती..
***
४.
सिस्टर संगीता थकली होती… तशी तिला थकव्याची सवय होती…
…तिचं कामच तसं होतं… प्रत्येक शिफ्टला तिला अख्ख्या वाॅर्डभर फिरायला लागायचं… पेशंट्सना वेळेवर औषधं देणं, त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करणं हे तिचं पगाराचं काम होतं… पण, हिंमत हरत चाललेल्या, बंदिस्त राहून वैतागलेल्या पेशंटांना धीर देणं हे कामही ती आनंदाने करायची… ती दिसली की लोकांना बरं वाटू लागायचं… आता आपण बरे होणार, असा विश्वास वाटू लागायचा… हे करताना ती किती थकून जायची, हे कधीच कुणाला कळायचं नाही…
…पण यावेळचा थकवा वेगळा होता… कोरोनाच्या वाॅर्डमध्ये तिची नियुक्ती होती… नुसता मेडिकल मास्क लावून किंवा पूर्ण अंग झाकतील कपडे घालून आणि सतत निर्जंतुकीकरण करून, हात धुवून या रोगापासून वाचता येणार नाही, हे तिला पुरतं ठाऊक होतं, तिच्याबरोबर काम करणाऱ्या इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही हे माहिती होतं… पण, हे काम कुणी ना कुणी करणं आवश्यक होतंच… आपण होता होईल तो काळजी घ्यायची… हा रोग आपल्या कोट्यवधींच्या देशात पसरू द्यायचा नाही, यासाठी लढायचं, हे तिने ठरवलं होतं…
…जनता कर्फ्यूच्या संध्याकाळी सगळीकडे लोकांनी टाळ्या-थाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा तर तिला एकदम भरूनच आलं होतं… एवढ्या प्रचंड जनसमुदायाला आपल्याविषयी, आपल्या पेशाविषयी इतकी जिव्हाळ्याची, आदराची भावना आहे, तिच्यातून उतराई होण्याचा होता होईल तेवढा प्रयत्न आपण करायचा, हे ठरवून ती दुप्पट जोमाने कामाला लागली होती… तेवढीच ती थकली ही होती…
…हाॅस्पिटलच्या घरी पोहोचवणाऱ्या गाडीत तिचा कधी डोळा लागला, ते तिला कळलंही नाही…
…तिच्या चिगट चारमजली इमारतींच्या सोसायटीसमोर गाडी पोहोचली आणि तिला गोंगाटाने जाग आली…
तिने जे पाहिलं, त्यावर तिचा विश्वास बसेना… तिचं सगळं कुटुंब रस्त्यावर काढण्यात आलं होतं… टाळ्या-थाळ्या वाजवणारे, अडीअडचणीला हक्काने तिला बोलावून नेणारे, डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या नेणारे शेजारी अंतर राखून गोळा झाले होते आणि म्हणत होते, ‘तुमची मुलगी कोरोना वाॅर्डमध्ये काम करते… तिच्यापासून तुम्हाला आणि तुमच्यापासून आम्हाला संसर्ग झाला तर जबाबदार कोण?’
Main Concept : Mukesh M
Additional Writing : Gourish D