Thursday, 13 September 2018

बाबा आणि बाप्पा

बाप्पा
आज गणपती आले.सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे..ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन सगळीकडे होतंय. या वातावरणात डेकोरेशनची लगबग आहे, आगमनाचा उत्साह आहे, उत्साहाचा नाद आहे. मूर्तीचं पावित्र्य आहे, मंडळाचे देखावे आहेत.पोरांची धडपड आहे.विसर्जनाची वेळची झिंग आहे..एकूणच काय वातावरण आनंदी आहे..

मला आठवतोय तो माझ्या लहानपणीचा बाप्पा.त्यावेळी आम्ही आमच्या जुन्या घरात देशपांडे वाड्यात रहायचो.
( तीन वर्षांपूर्वीच नवीन घरात शिफ्ट झालो.) गणपती 15 दिवसांवर येऊन ठेपले की मग आम्ही मी आणि बाबा मूर्ती कुंभरवाड्यात ठरवायला जायचो. कुंभार मंडळींची लगबग जून महिन्यापासूनच सुरू झालेली असायची. त्यावेळी मी लहान होतो त्यामुळ विविध गोष्टींची आवड.मग 10-15 मुर्त्या पाहून झाल्या की फायनली मूर्ती ठरायची. गाईवरचा गणपती,बाल गणेश, दगडूशेठ इत्यादी प्रकारचे गणपती आम्ही बसवले होते.म्हणजे ते माझ्या आठवणीत आहेत.

मग बाप्पा अगदी एक-दोन दिवसांवर येऊन ठेपायचा आणि मग विविधवस्तूंची खरेदी सुरू व्हायची डेकोरेशनसाठीची.
मग आदला दिवस उजाडायचा आणि शाळेतून घरी यायचं तोपर्यंत बाबापण कोर्टामधून आलेले असायचे मग डेकोरेशनची लगबग सुरू व्हायची. भिंती रंगवून त्यावर विविध पद्धतीच्या नक्षीकाम केलं जायचं.मग गणपती जिथं बसतो तिथं मखर ठेवायचं मग समयी,पणती, मग त्यावर्षीची वेगळी थीम त्यावर डेकोरेशन व्हायचं.मी ते सगळं खूप एन्जॉय करायचो.बाबा उंचावरचं डेकोरेशन करायचे.स्पेशली माझी आई तिला परफेक्शनची खूप हौस त्यामुळं माझं आणि बाबांच डेकोरेशनच्या बाबतीत तिच्याशी हमखास खटकायचं.. पण तेही मजेमजेतच..

मग गणेशचतुर्थीचा दिवस यायचा.सकाळी लवकर उठून गणपती आणण्यासाठी मी ,बाबा, माझे काका असे आम्ही सगळे एकत्र चालत जायचो.मग ढोल ठरवला जायचा.. ढोल ताशांच्या गजरात आम्ही घरी बाप्पाला घेऊन यायचो.गुरुजी घरी येऊन प्रतिष्ठापना करायचे.आरती व्हायची.
मग सुरू व्हायची मोदकांची लगबग.मी लहानपणी ‘मला एकवीस मोदक खायचेत’हा हट्टच धरून बसायचो मग बाबांची आणि माझी मोदक खायची रेस लागायची मी जोमात सुरुवात केली तरी 4-5 च्या वर माझी गाडी जायचीच नाही.. मित्र घरी गणपती पहायला यायचे, मी त्यांच्या घरी जायचो. रोजची रोज आरती व्हायची.मित्रांच्या घरी आरत्या व्हायच्या. दुर्वा शोधून आणायच्या, गुलबाबक्षीच्या फुलांचा हार केला जायचा. मंडळात मात्र मी कधीच गेलो नाही.अशाप्रकारे गणपतीचे 4-5 दिवस संपल्यानंतर गणपतीचे जिवंत देखावे सुरू व्हायचे.मग मी-आई-बाबा-काकू-सुखदा दीदी असे आम्ही गणपती पहायला जात असू.विसर्जनावेळची तर झिंगच वेगळी होती.साश्रुपूर्ण नयनांनी बाप्पाला निरोप दिला जायचा.

आज गणपती आले आणि फार नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.
2011 साली बाबा गेल्यानंतर मला मात्र गणपती विघ्नहर्ता आहे की नाही हेच समजत नव्हतं आम्ही मग त्यासाठी विघ्नहर्त्याला त्यासाठी दोषी मानलं कारण आमचं विघ्न त्याने हरलं नव्हतं.मग थोडेफार आठवतात ते मी आणलेले गणपती.
हे दिवस जरी 5-6 वर्षापूर्वीचे असले तरी बाबांच्या आठवणी ज्या डोक्यात फिट्ट बसल्या आहेत त्या मात्र मी गणपती आणतानाच्या नाहीत. बाबा गेलेल्या वर्षी
उचलत नसताना अनवाणी पायांनी आणलेला गणपती आठवतो फक्त ….
आणि आजसुद्धा पूर्वीसारखा मी गणपती बसवतो पण फारसा उत्साह नाही.डेकोरेशन सुद्धा जेमतेम करतो..
पण प्रत्येकवेळी गणपती आणताना बाबा आठवतात त्या पूर्वीच्या आठवणी मनात तरळतात आणि तेवढ्याच आठवणी मला नास्तिक होऊ देत नाही..

©गौरीश देशपांडे

Saturday, 8 September 2018

समाजचक्र

आज खूप दिवसांनी घरी आलो.घरी काही कामे होती ती केली जसं की गणपती जवळ आल्याने गणपती ठरवणे त्यातलंच एक काम होतं खरेदी…
आई ऑफिसवरून घरी आली मग थोडावेळ आईबरोबर गप्पा मारल्या मग आई म्हणाली जरा काम आहे  घरगुती सामानाची खरेदी करून येऊ !
आईला म्हणलं, चालतय मग मी व आई गाडीने आमच्या इथल्या आपला बझार या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये गेलो. आईने भलीमोठी,मला कंटाळा येईतोपर्यंत खरेदी केली.
झालं एकदाच सगळं शेवटी,मग बिल भरलं आणि त्या पॉईंटला मी बाहेर आलो..
बाहेर एक लहान मुलगा दिसला,त्या मुलाचा चेहरा मी आयुष्यभर नाही विसरणार,चेहऱ्यावर विलक्षण तेज, डोळ्यात एक प्रकारची चमक, अंगावर मळलेले कपडे आणि त्यातून उठून दिसणारा तो मुलगा.. कुणाला तरी शोधत होता बहुतेक
त्याने काऊंटरवर विचारलं पण त्याच्या त्या वेषाने त्याला तिथं कुणी थांबवून घेतलं नाही. तो शेजारच्या दुकानात गेला तिथेही अगदी तसाच अनुभव..मग तो तिथेच थांबला , एक दोन मिनिटं विचार केला आणि पुन्हा मी जिथं थांबलो होतो त्या दुकानात आला मला वाटलं  पुन्हा काऊंटरवर हुज्जत वैगरे होईल.पण यावेळी तसं काही झालं नाही.तो तिथं फक्त उभा राहिला. तो मुलगा अगदी घायकुतीला आला होता,त्याच्या तोंडावरून ते समजत होतं. मला असं काही बघितलं की जाम कळवळून येतं, अगदी वाईट वाटतं. मी तोंडावर,फेसबुकवर, व्हाट्सएप स्टेट्सवर अगदी कितीही निष्ठुर दिसत असलो, कितीही पाषाणहृदयी वाटलो तरी तो फक्त आभास आहे.माझे जे जवळचे लोक आहेत त्यांना माझी हळवी बाजू पूर्णपणे माहिती आहे.साहजिकपणे मी पुढं त्या मुलाकडे गेलो,काउंटरवाला ओळखीचा असल्याने म्हणाला,साहेब नका काही विचारू त्याला, रोजची कटकट आहे त्याची,..
मी त्या काउंटरवल्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं,आणि मुलाकडे गेलो.त्याला बोलतं करण्यासाठी पाणी हवं आहे का ? चहा वगैरे हवा आहे का इत्यादी गोष्टी विचारल्या पण तो छोटा फक्त मानेने नको म्हणत होता…
मग तो शांततेचा फुगा मीच फोडला, विचारलं कुणाला शोधतोय ..
तेवढ्यात काऊंटरवरचा इसम म्हणाला, साहेब त्याला काय विचारताय ? त्याच्या बापाला शोधतोय तो ;
त्याचा बाप इथं हमाल म्हणून काम करतो..मगाशी त्याला पगार दिला,आता गेला असेल नेहमीच्या दारूच्या अड्ड्यावर हिणकस स्वरात दुकानदार म्हणाला.
मी त्या मुलाकडे पाहिलं,त्याच्या डोळ्यात पाणी होतं,भरलेले त्याचे ते डोळे काहीतरी सांगत होते, काहीतरी अगम्य गोष्ट,जी त्याने भोगलीये,नियतीने त्याला भोगायला लावलीये. अखेर त्याला शेजारील बेकरीत घेऊन गेलो, तिथं काय खाणार विचारलं, त्याने काचेला हात लावून त्याने त्याला हवा असलेला पदार्थ दाखवला.मी बेकरीवाल्याला तो द्यायला सांगितला. त्याने तो अधाशासारखा संपवला.आणखी घेणार का मी विचारलं तो मानेनेच हो म्हणला.अशा रीतीने त्याने दोन पॅटिस खाल्ले.मग तो जरा बोलायच्या  स्थितीत आला. मी चौकशी सुरू केली.त्यातून असं समोर आलं की
त्याचं नाव सूरज, बाप इथं हमाली करतो, आईचा पत्ता नाही.घरी अजून दोन भाऊ आहेत.कालपासून काहीच खाल्लं नव्हतं त्याने. बाप दारू पितो आणि घरी येऊन पोरांना मारतो.तीन दिवसांपूर्वीच घरातलं सामान संपलं तेव्हापासून हा सूरज नुसता भटकतोय.बालमजुरीमुळे कुणी कामावर पण ठेऊन घेत नाही.शाळेबद्दल विचारलं तर वर्षभरापूर्वीच सोडल्याचं समजलं.
पुढे तो म्हणाला बापाचा पगार आज, पैसे मिळाले की तो प्यायला जाईल म्हणून त्याला थांबवायला मी आलोय पण बाप कुठं दिसत नाहीये, नाहीतर पुन्हा दोन भाऊ आज उपाशी राहतील.. मी हे ऐकून उडालोच तेवढ्यात त्याचे वडील त्याला दिसले तो त्यांच्याकडे धावत सुटला… वाटलं की त्याला थोडे पैसे द्यायला हवे होते, पण वेळ निघून गेली होती.

माझ्या मनात त्याच्याविषयी करुणा आणि कौतुक एकाचवेळी दाटलं.
वय अवघं 10 / 12
एवढ्या वयात या कोवळ्या लेकराला इतकी समज कुठून आली असेल.ही परिस्थिती काय काय भोगायला लावते लोकांना. आपण मोठ्या घरात राहतो, ऐशोरामात जगतो पण असे कित्येक सूरज आपल्या आजूबाजूला परिस्थितिशी, समाजाशी लढत असतात,त्यांनी न केलेल्या पापांचे भोग भोगत असतात पण ना आपल्याला फिकीर असते ना समाजाला ना सरकारला..
आपण कल्पना करत नाही एवढ्या यातना लोक दररोज भोगत असतात आणि ही नियती हे सगळं गिळून टाकते निगरगट्टपणे.. एवंढया सहज की त्याच्या असण्याने किंवा नसण्याने दुनियेला काही फरकच पडत नाही
पण फरक पडेल
एक दिवस फरक नक्की पडेल
जेव्हा ह्या सगळ्यापुढं का ? असा प्रश्न हे असंख्य सूरज विचारतील ना तेव्हा फरक पडेल पण
तेव्हा मात्र  आपल्याकडे उत्तरचं नसेल….

@गौरीश 

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...