Saturday, 18 August 2018

राजगड भ्रमंती

खुप दिवस होत आले होते लंगडतोड भटकंती करून,म्हणजे तशी माझी भटकंती सुरूच होती पण ती मात्र छोट्या प्रमाणावर मर्यादित होती.मोठ्या 2 दिवसाच्या ट्रेकचा दणका उडवायचा असा मनाशी प्लॅन पक्का केला होता पण वेळ जुळून येत नव्हती.तसा माझा चावंड, शिवनेरीचा ट्रेक थोडक्यातल्या गैरसमजुतीमुळं हुकला होता.
मात्र यावेळी मी वेळ काढलाच, दिवसच असा निवडला की कॉलेजची सुट्टी आणि ट्रेकची भट्टी एकत्रच जमून आली.
तसं त्या ठिकाणी जाऊन रहायचं हे माझं खूप दिवसांपासून मनात साठवलेल स्वप्न होतं
आणि ते सत्यात उतरल 15 ऑगस्टला

आम्ही जात होतो राजगडाला
राजगड म्हणजे राजीयांची राजधानी
राजगड म्हणजे स्वराज्यलक्ष्मीचं सिंहासन
राजगड म्हणजे भव्यतेचं मूर्तिमंत प्रतीक
राजगड म्हणजे दुर्गांचा राजा
राजगड म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा अभिमान
आणि ह्याच स्वातंत्र्याचा अभिमान बाळगत आम्ही जात होतो राजगडावर तेही भारताच्या स्वतंत्रदिनादिवशीच.
किती मोठा योग जुळून आला होता हा.
खरंतर मला राजगडचं वेड हे गोनीदांच्या वाघरु या कादंबरीमुळं लागलं.. तो बाबुदा, हनुवती, यशोदा ही सगळी पात्रं मला खूप भावली होती,मी त्यांच्याकडं आकर्षित झालो होतो. मग काय सकाळी उठलो लवकर , तयार झालो आणि स्टँडवर गेलो.नसरापूर फाट्यावर थांबणाऱ्या गाड्यांची चौकशी आधीच करून ठेवलेली असल्याने जास्त प्रॉब्लेम आला नाही पण गाडीचा वाहक मात्र पक्का गेमर निघाला त्यानं माझ्याकडून स्वारगेटचं तिकीट काढलं आणि नसरापूरला उतरवलं. त्याला मी खूप विनंत्या केल्या की खेड शिवापुरचं तिकीट द्या, कापूरहोळचं तिकीट द्या पण हा गाडीला स्टॉप नाही म्हणून अडूनच बसला.. मी म्हणलं जाऊदे कुठं 5-50 रूपयांसाठी नडा
मग सुरू झाला एसटीचा प्रवास, चंद्र-सूर्य डोंगर, चंदनगड-वंदनगड पाहून मन सुखावलं.. नऊच्या सुमारास मी नसरापूर फाट्यावर उतरलो आणि पुण्याहून येणाऱ्या आमच्या टीमची वाट पहात बसलो मधल्यावेळात एक वडा आणि चहा हाणून घेतला. थोड्यावेळानंतर रोहन आणि त्याचा मित्र पुष्कर आले.
रोहन हा तसा माझा पहिल्यापासूनचा मित्र. त्याच्याबरोबर मी वासोट्याच्या ट्रेकला गेलो होतो आणि आज राजगडावर जात होतो. मग पाठोपाठ निखिल,सूरज,रवी, वैभव आले आणि मग तन्मय आला.
तसं राजगडला बाईक राईड करायची असं मनात होतंच पण बाईक राईड ती पण पावसातून करण्याचं थ्रिल मी त्या दिवशी अनुभवलं. सुरजच्या गिक्सरवर आम्ही तिघे राजगडच्या पायथ्यापर्यंत आलो. सगळी टीम पोहोचल्यावर सुरू झाली ती  राजगडाची चढण..
राजगडाचं ते मनमोहक पावसाळ्यातलं, नटलेलं रूप मी मनोमन साठवून घेत होतो. शेजारी तोरण्याला जाणाऱ्या डोंगराची रांग धुक्यात हरवलेली होती.
राजगड हा गडपुरुष अगदीच शांत भासत होता पण जसजशी चढण सुरू झाली तसतशी त्यानं त्याचं रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली..राजगड दमवतो फार कुठल्याही बाजूने चढा..
राजगड चढताना मध्ये फुललेली सोनकीची, मिकीमाऊसची फुलं मनाला गारवा देत होती आणि हमखास पाय सटकणाऱ्या वाटेवर मी, तन्मय, आणि वैभव आपापले पाय रोवत पुढे चाललो होतो. तन्मयचा रेनकोटमुळं त्याची फार अडचण होत होती.शेवटी मी तो गोल गुंडाळी केला आणि त्याची दोरी त्याच्या कमरेला गुंडाळण्यासाठी त्याला दिली. वातावरण तर लाजवाब पडलं होतं. त्या वातावरणातून बाहेर पडूच नये असं वाटत होतं,थांबत, फोटो काढत आम्ही राजगडच्या वाटेवर मार्गक्रमण करत होतो.
पायऱ्या लागल्या त्या पायऱ्यातून वळणाची जाणारी वाट एवढी सुंदर होती की त्या पायऱ्या संपूच नये असं वाटत होतं
मग पाली दरवाजा मार्गे आम्ही गडावर गेलो.
गेल्या गेल्या सदरेवरून खाली जाऊन पद्मावती मंदिरात गेलो. दर्शन घेतलं आणि बॅगा ठेवल्या. बाहेर आलो तोवर निखिल दादाने भज्यांची प्लेट पुढं केली. सकाळच्या वडपाववर राजगड चढलो होतो मग काय समोर गरमागरम भजीची प्लेट क्षणार्धात रिकामी केली. अशा एकामागून एक खूप प्लेट आल्या.रेंज थोडीफार होती मग आईला फोन लावला.
आणि भटकंतीला सुरुवात केली.
पहिल्यांदा गेलो सुवेळेकडं ..
सुवेळा पाहिली, तिचे ते बुरुज पाहिले, बांधकाम खरंच अप्रतिम होतं. मग नेढ्यात गेलो
उन्हाळ्यात इथं मधाची पोळी असल्यामुळं जाता आलं नव्हतं त्यामुळं आता चान्स सोडणार नव्हतो.सगळी नेढ्यात गेलो, भारताचा ध्वज आणला होता, त्याच्याबरोबर फोटो काढले आणि पुढं पूर्ण माची पाहिली.
सुवेळा पाहून आलो तेव्हा साडेचार होऊन गेले होते. आल्याबरोबर संतोषरावांनी गरमागरम पिठलं भाकरी वाढली..
पोटभरून ती खाल्ली पाणी पिऊन ढेकर दिला आणि तृप्त झालो. खरं तर आपण एकदा गड चढून जातो तेव्हा एवढे दमतो तर मग ही माणसे मोठं मोठं सामान सोबत घेऊन उन्हापावसात कसे बरं गड चढत असतील ह्या भावनेनं मनात कुतूहल आणि डोळ्यात पाणी एकाच वेळी दाटलं. ही दुनियादारीची रीत माणसांना काय काय करायला लावते हे ही राजगड मला शिकवून गेला.
मग सुरू झाल्या गप्पा.तन्मय केळकर ह्या अफाट ज्ञान असलेल्या माणसाला मी इथं भेटलो.हे खरं तर पेशाने इंजिनियर पण ह्यांनी संस्कृत पुस्तक लिहिलं आहे आणि सध्या ते शीख तत्वज्ञानाचा अभ्यास करत आहेत. ह्या माणसाला किती भाषा बोलता याव्यात बरं
मराठी, हिंदी,कन्नड,इंग्लिश,संस्कृत,रशियन,गुजराती,उर्दू
तन्मय,सूरज ह्यांच्याबरोबर अफाट गप्पा रंगल्या.सूरज सारखा उत्साही कार्यकर्ता प्रत्येक टीममध्ये हवाच कारण आमचे पाय दमलेले असताना हा आणखी दोघांना सोबत घेऊन बालेकिल्ला चढून आला.
स्लीपिंग बॅग मध्ये झोपुन तसेच एका दिवसात जिवलग झालेल्या दोस्तांबरोबर गप्पा मारताना आपण भाग्यवान आहे ह्याची जाणीव झाली. दिवस उजाडला
चहा पिऊन संजीवनी माचीकडे गेलो. संजीवनी माची खरंच संजीवनी देते.तिचं ते रूप अफाट आहे.त्यातले चिलखती बुरुज, चिलखती तटबंदी म्हणजे केवळ अफाट.
दोन तास संजीवनी माची बघण्यात गेले. पावणे अकरा  वाजत आले होते. बालेकिल्ला झाला असता पण टीम मधल्या काही सदस्यांना नोकरीला जायचे असल्याने गड उतरावा लागला..
दगडानी भरलेल्या निसरड्या वाटेवर पाय जपून टाकत गड उतरला..
गड उतरल्यावर गडाचं रूप पुन्हा एकदा पाहिलं आणि
मनी एक भावना उमटली की मी स्वातंत्र्यदिनादिवशीच
राजगडावर स्वातंत्र्य अनुभवलंय, मन मोहरून उठलं आणि मी
समाधानानं सातारच्या वाटेवर निघालो..

©गौरीश देशपांडे





Wednesday, 8 August 2018

आवडते दिवस आवडतं गाणं

तर एकदा काय झालं, नक्की काय झालं हे मलाच आठवत नाही पण माझं मन ताळ्यावर नव्हतं कुठल्या विचाराच्या तंद्रीत होतो,मानसिक ताणतणाव भरपूर होता.गेले काही दिवस कामच बोजा फारच वाढला होता, मरेतोवर काम आपण करायचं आणि क्रेडिट मात्र दुसऱ्याला असा काहीसा प्रकार होता तो, मी मात्र आतल्या आत कोंडलो गेलो होतो, घुसमट तरी कोणाजवळ व्यक्त करायची ,घरी आई एकटी होती, खूप काळजी करायची  ; दिवसातून तीन चार वेळा फोन यायचे... काम एवढं होतं की खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती आणि तेवढ्यात आईचा पोचलास का ऑफिसला ? 
म्हणून फोन आला. ऑफिसमध्ये आधीच एका महत्वाच्या कामावर डिस्कशन चाललं होतं आणि त्यात हा फोन, मी फोनवर  अक्षरशः किंचाळलो आणि फोन टेबलावर लिटरली फेकला..  खुर्चीत मान टेकवून तसाच काही वेळ पडून राहिलो, मग एकदमच मॅनेजरला मला ' सिक लिव्ह '  हवी आहे असा मेसेज टाकला , गाडी काढली आणि ऑफिसमधून निघालो....
निघालो काय अडकलो, ऑफिसच्या पुढच्या चौकातला सिग्नल बंद होता . एक ट्रॅफिक हवालदार वाहतुक नियंत्रित करत होता मग काय सगळा बट्ट्याबोळ ..वातावरणात सगळा उबग भरून राहिला होता.. शेवटी अर्ध्यातासाभरात शहरातून बाहेर पडलो आणि हायवेला लागलो 
मी कुठे चाललो होतो मलाच माहिती नव्हतं, रस्ता फुटेल तिकडं जायचं मी ठरवलं होतं. गावाच्या बाहेर पडल्यापासून मला तासभर उलटून गेला होता.. थोड्याच वेळात सातारा आला, पोटात कावळे ओरडायला लागलेच होते आणि ह्या कामाच्या व्यापात काय खायला पण जात नव्हतं .. 
**कात गेली दुनियादारी ह्या निर्धारावरच ऑफिस मधून बाहेर पडलो होतो.. एका ढाब्यावर मस्त जेवलो आणि जरा हातपाय मोकळे केले पण मी अजून आईवर जाम रागावलो होतो,आईला एक साधा मेसेज टाकला की ' मला तुझ्याशी बोलायचं नाहीये जा '  म्हणून  आणि पुन्हा गाडी चालवायला लागलो .. एव्हाना दुपार होत आलेली आणि मी कोल्हापूर पर्यंत आलेलो तसाच पुढे गेलो आणि राधानगरी मधून फोंडा घाटाने खाली कोकणात उतरलो.. मी कुठं होतो हे फक्त मला माहिती होतं फक्त ,ना आईला ना बॉसला ,फक्त मला आणि माझ्या अंतरातम्याला... 
6 च्या सुमारास देवबागला पोहोचलो..डोक्यात काही नसलं ना की माणूस काहीही करतो तसा माझा देवावर थोडाफार विश्वास आहे म्हणजे मी म्हणतो की माणसाने बॅलन्स असावं आणि देवळात दर्शन घेण्याततही काही इंटरेस्ट नव्हता पण पुढे आलेला प्रसाद हवाहवासा होता.प्रसाद घेतला आणि मंदिराच्या बाहेर आलो एव्हाना साडेसहा वगैरे वाजले असतील तसाच चालत बीचवर आलो आणि एकटक त्या क्षितिजाकडे पाहत आयुष्यातल्या घटकांची आकडेमोड करू लागलो त्यातून असं लक्षात आलं की मी मात्र अनेकांना बेरजेत धरलं होतं पण त्यांनी मला त्यांच्यातून वजा केलं होतं. त्या संपुर्ण बीचवर जास्त कुणी नव्हतं,दूरवर एक स्त्री आणि एक लहान मुलगा होता.. त्यांना सोडल्यास मी त्या बीचवर पूर्ण एकटा होतो अगदी एकटा.. मी चालू लागलो ती स्त्री आणि तिचा मुलगा हळूहळू जवळ यायला लागले. मला तर काही उद्योग नव्हताच मी तो मुलगा काय करतोय हे लांबून अंतर ठेवून पाहायला लागलो.तो त्या रेतीत काहीतरी शिल्प काढायचा प्रयत्न करत होता.. तो अगदी छोटा म्हणजे 5/6 वर्षाचा असावा. तो काही तरी करत होता पण त्याला ते जमत नव्हते .. मग तो त्याच्या आईकडे नुसते पहायचा आणि त्याची आई त्याला ते करून द्यायला मदत करायची.. असं 5/6 वेळा झालं असेल, प्रत्येक वेळी त्याची आई त्याला न  हसत हसत मदत करायची ..भरतीची वेळ होती अचानक पाणी फार पुढं आलं आणि त्या मुलाच्या शिल्पावरून गेलं..त्याच्या आणि त्याच्या आईच्या प्रयत्नांवर पाणीच पडलं. तो मुलगा रडायला लागला , हिरमुसला.. आईने त्याला जवळ घेतलं ,समजवून देऊ लागली.. मला वाटलं हे इथून आता जातील पण हटेल ती आई कसली ? तिने त्या मुलाला काय सांगितलं काय माहिती ? पण पुढच्या पाचच मिनिटात तो आणि त्याची आई हसतमुखाने एकत्र ते शिल्प पूर्ण करू लागले.. 

मी तो प्रसंग पाहून अंतर्मुख झालो होतो.मनाच्या बॅगराऊंडवर गाणं सुरू झालं होतं.. मी कम्प्लिट डोळे मिटून घेऊन ते गाणं ऐकत होतो.. 

लुका छुपी बहुत हुई सामने आ जा ना
कहां-कहां ढूंढा तुझे
थके है अब तेरी मां
आजा सांझ हुई क्या बताऊं मां कहां हूं मैं
यहां उड़ने कोमुझे तेरी फिकर
धुंधला गयी देख मेरी नज़र आ जा ना
 मेरे खुला आसमान है
तेरे किस्सों जैसा भोला सलोना जहां है
यहां सपनो वाला
मेरी पतंग हो बेफिक्र उड़ रही है मां
डोर कोई लुटे नहीं बीच से काटे ना
आजा सांझ हुई..
तेरी राह ताके अंखियां
जाने कैसा कैसा होए जिया
धीरे-धीरे आंगन उतरे अंधेरा, मेरा दीप कहां
ढलके सूरज करे इशारा चंदा तू है कहां
मेरे चंदा तू है कहां
आजा सांझ हुई..
कैसे तुझको दिखाऊं यहां है क्या
मैंने झरने से पानी मां तोड़ के पिया है
गुच्छा गुच्छा कई ख्वाबों का उछल के छुआ है
छाया लिया भली धुप यहां है
नया-नया सा है रूप यहां
यहां सब कुछ है मां फिर भी
लगे बिन तेरे मुझको अकेला
आजा सांझ हुई मुझे तेरी फिकर  धुंधला गयी देख मेरी नज़र आ जा ना 
रंग दे बसंती हा राकेश ओमप्रकाश मेहराचा लँडमार्क चित्रपट.. सर्वांच्या भूमिका उत्तम. ह्यात कॅप्टन अजय राठोडंच पात्र निभावलय ते आर . माधवन ह्याने.. तो साहसी कॅप्टन असतो आणि तो त्याची सेवा बजावताना शहीद होतो.. सहाजिकच त्याच्या आईला आणि त्याच्या प्रेयसीला हा मोठा धक्का असतो . कॅप्टन अजय राठोडचं इवलंस भावविश्व ह्या गाण्यात दाखवलंय. वडिलांच्या निधनानंतर आईचं आणि त्याचं नात्याचे पदर ह्या गाण्याच्या शब्दांत पूर्णपणे उतरवलेत..तो त्याच्या आयुष्यात पुढे गेलेला असला तरी आईला त्याची काळजी असतेच हे ह्या गाण्याच्या दुसऱ्या कडव्यात एकदम सहजरित्या मांडलंय.. प्रसून जोशी सारख्या गितकाराचे शब्द आणि रेहमानसारख्या संगीतकाराचं संगीत म्हणजे बाप.. त्यात लतादीदींचा आवाज म्हणजे ऑन द टॉप नॉच. लोकांच्या हृदयात जाण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. माझ्या हृदयात ती जागा रहमान आणि  लतादीदींसाठी राखीव आहे..

मी डोळे उघडले , माझ्या डोळ्यातुन पूर्णपणे अश्रू वाहत होते, तेव्हा ती आई आणि तो तिचा मुलगा तिथे नव्हते.होतो तिथे तर तो मी,समुद्र आणि सूर्य... मी आईला फोन केला,आईने फोन उचलल्या उचलल्या चौकशीचा भडिमार केला.. मी सगळ्या प्रश्नांची हसत हसत उत्तरे दिली.. आणि फोन ठेवला त्या मगाशीच्या मेसेजवर माझं मलाच हसू येत होतं. आयुष्यात कितीही संकटे आली तरी जोपर्यंत तुमची आई तुमच्याबरोबर आहे तोपर्यंत कुठलही संकट तुमचं काही बिघडवू शकत नाही हे मला कळलं होतं  फरक एवढाच होता की त्या मुलाला ते वयाच्या 5/6 वर्षी समजलं होता  आणि मला थोडं उशिरा ! 
आता सूर्य अस्ताला जात होता, रात्रीचा अंमल वातावरणावर जाणवू लागला होता.. हवेत थोडा गारवा जाणवू लागला होता.. कातरवेळ नुकतीच सुरू झाली होती.. अंधाराचे घट फुटू लागले होते. मीही गाडीत येऊन बसलो गाडी सुरू केली आणि निघालो.. आता सगळं कसं शांत झालं होतं. मोकळं आणि हलकं वाटत होतं. मन आणि विश्व सिद्ध झालं होतं ते उद्या उगवणाऱ्या सूर्याच्या झळाळीसाठी !! 
© गौरीश देशपांडे 
मला सतत फोन करणाऱ्या आणि माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या , मनाने चिरतरुण राहणाऱ्या माझ्या आईस समर्पित..
टीप- हा प्रसंग घडलेला नसून अस्मादिक लेखकाची तेवढी कल्पनाशक्ती आहे.... मग वाचून काय करताय
हेडफोन्स अडकवा आणि आनंद लुटा या गाण्याचा..


Sunday, 5 August 2018

फ्रेंडशिप डे

उद्या 6 ऑगस्ट
आद्याला जाऊन 3 महिने होतील आणि आज आहे Friendship Day .विचार करा आजचा दिवस साजरा करायला तुमचा मित्र तुमच्यासोबत नसणं याहून वाईट आणखी काय असू शकतं.मुळात माझा ह्या कुठल्याही डेज वर अजिबात विश्वास नाही
का ? कारण आम्ही पण बांधले होते फ्रेंडशिप बँड एकमेकांना, जेवलो होतो फ्रेंडशिप डे दिवशी एका हॉटेलात..आयष्यभरात कुठलंही संकट जरी आलं तरी एकमेकांना साथ देऊ असा चंग बांधला होता आम्ही; एवढंच काय आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे ह्याचेसुद्धा प्लॅन बनवून ठेवले होते आम्ही;  पण झालं का काही ? सांगा मला झालं का काही , झाला काही उपयोग, तो फ्रेंडशिपबँडचा धागा राहिला का कायम आमच्यासोबत ? नाही ना
नाहीच राहिला... त्याला आयुष्याच्या त्या कठीण वेळी मला साधा फोन करावासा नाही वाटला. झाला काही उपयोग ?
तो धागा त्याला रोखू शकला नाही इथंच सगळं संपल, कदाचित माझी मैत्री कमी पडली असावी.
फार लवकर सरले ना तीन महिने. असंच वर्ष जाईल, वर्ष का वर्षें उलटतील पण मनाच्या कोपऱ्यात भळभळत असलेल्या त्या जखमेवरची खपली मात्र दर फ्रेंडशिप डे मात्र पुन्हा उडेल
.नियती इतकी निष्ठुर का बरं झाली असावी ? का तिने असा हा विचित्र खेळ खेळला असेल ? मला रोज रात्री हा प्रश्न पडतो पण ह्या माझ्या इवल्या जगात प्रश्नच इतके झाले आहेत की उत्तरं शोधून लिहिली तर एक वही भरेल आख्खी,पण अशा अनेक ज्ञात/ अज्ञात घटना  नियतीने पचवलेल्या असतात आणि एक ढेकरही दिलेला नसतो साधा आणि आपण जेव्हा केव्हा हा सवाल विचारतो नियतीला तेव्हा तिच्याकडे उत्तरच नसतं असतात ते फक्त आपले अस्वस्थ श्वास आणि आपल्या डोळा आलेलं पाणी ह्या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळंच मिथ्या...

एक गाणं आहे जुनं हिंदी ते मला आठवतंय

आनेवाला पल जानेवाला है
आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है... 
त्याच्यामुळं आहे ह्या क्षणाला मोठं समजून तुमच्या मित्रांना केवळ तुमच्या मित्रांनाच नाही तर तुमच्या सर्व आप्तजनांना वागवा... कारण माणसं जेव्हा नसतात तेव्हाच त्यांची खरी किंमत कळते. काय  माहीत येणारा काळ काय घेऊन येईल म्हणूनचं शक्यतो मित्रांना पुरेपूर वेळ द्या... 


 मला माझी आई , माझे अनेक मित्र,नातेवाईक  म्हणाले गौरीश काळ हेच ह्यावरचं उत्तर सणार आहे पण मला नाही वाटत तसं कारण त्या अस्वस्थ श्वासांनी वरखाली होत असलेली छाती आणि भिजलेली उशी मला मात्र कधीच पारखी झालेली नाहीये !!!

©गौरीश देशपांडे

सदर लेख/पोस्ट ही मी माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला की जो आता ह्या जगात नाही आहे अशा आदित्यला अर्पण करत आहे... 

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...