Tuesday, 1 May 2018

खरं तर मला भटकायला खूप आवडतं,दर महिन्यात एखादया गडावर किंवा कुठे ना कुठेतरी भटकंती ठरलेलीच असते.भटकणाऱ्या लोकांसाठी सह्याद्री म्हणजे प्राणवायू आहे आणि माझ्यासारख्या लोकांना सह्याद्रीत भटकंती करून म्हणजे चारधाम यात्रेचं पुण्य मिळतं ..
साधारणतः महिनाभर आधी वनखात्याकडून प्राणीगणनेची माहिती मिळाली, त्यात कोयना अभयारण्यात भटकंती म्हणजे भटक्यांना पर्वणीच म्हणून मग मी लगोलग फॉर्म भरला आणि  गणनेच्या दिवसाची चातकासारखी वाट पाहात बसलो..
अखेर तो दिवस उजाडला, घरून निघालो, साताऱ्यातुन पाटणला आलो, घरी आलो घरी पूर्वकल्पना होतीच, बाहेरच्या बाहेरून आजोबांना नुसतं 'आजोबा येतो' असे म्हणलो आणि निघालो, खरं तर मी 15 दिवसांतून घरी येत होतो तरी घरी थांबून मी पाणी सुद्धा पिलं नाही कारण मला ओढ लागली होती जंगलात जाण्याची, वनचरांना आपल्या खऱ्या सख्या-सोबत्यांना भेटायची. खरे सोबती अशासाठी म्हणेन कारण प्राणिमात्रांच्या मनात कोणते छक्के-पंजे नसतात, त्यांना जीव लावला की ते आपल्याला जीव लावतात, त्यांच्या सहवासाची मला ओढ लागली होती पेट्रोलपंपावर टाकी फुल केली सोबतीला एक जास्तीची पेट्रोलची बाटली भरून घेतली.मी जात होतो कोयनेकडे, महाराष्ट्राच्या वन्यप्राणीसंपदेने भरलेल्या स्वर्गाकडे, गाडीची रेस फुल पिळली, बुंगाट सुटलो तसा मी गाडी हळू चालवतो पण काय करणार तरुणाईची धुंदी....
तासाभरातच नियोजित ठिकाणी पोहोचलो,रकसॅक काढली तोंड वगैरे धुतलं, राहण्याची जागा तर भारीच होती, वनखाते आपल्या लोकांची चांगली काळजी घेत होतं, आवरून बसलो थोडीफार रेंज होती तसेच ऑफिसमध्ये वायफाय सुद्धा होतं पण मला ह्यासगळ्यापासून लांब जायच्या होतं म्हणून मी खाली आलो. गावकऱ्यांबरोबर गप्पा मारत बसलो. मला असं स्थानिक लोकांबरोबर गप्पा मारायला त्यांचं जीवन जाणून घ्यायला खूप आवडतं जिथं जिथं जातो तिथं हा उद्योग करतो, त्यामुळं लोकांबरोबर ओळखी होतात आणि आपुलकीची वागणूक मिळते.गेल्या दोन चार दिवसांपासून दाढ दुखत होती नेमकी तिथेच दाढ दुखायला लागली.एका रात्रीसाठी तर जायचंय म्हणून गोळ्या काय घायच्या म्हणून मी पेनकिलर आणल्या नव्हत्या त्यात नेमकी तिथे दाढ नावाची ही अवदसा माझ्यावर कुठल्या जन्मीचा सूड घेत होती कुणास ठाऊक...
मी गप तळमळत तिथं झाडाच्या पारावर आडवा झालो, दहा एक मिनिटं गेली असतील तेवढ्यात एक म्हाताऱ्या आजी आल्या.त्यांनी मला विचारलं, "बाळा कंच्या गावावरनं आलास ,मी तळमळतच सांगितलं तेवढ्यात त्या म्हणाल्या थांब मी एक औषध करून आणते, मी आपलं ऐकल्यासारखं केलं आणि गप पडलो, आधी तर माझा कसल्या झाडपाल्यावर विश्वास नाहीये, ती आजीबाई काय आणणार होती कुणास ठाऊक..
दहाव्या मिनिटाला आजीबाई आणि तिचा गोड नातू हजर झाले, आजीबाईने कसलेतरी गरम गरम पाणी आणले होते, ती आजी म्हणली ह्याच्या चुळा भर "मी मनातल्या मनात देवा मला आता काय प्यायला लावतोस रे हे असं म्हणलं आणि डोळे बंद करून ते पिलं, भयंकर कडू होतं ते , त्याच्या चवीनंच उलटी येत होती, ते पिल्यावर माझं तोंड एकदम आवळून आलं मग मी जरा चारपाच वेळा खूळखूळ करून चुळा भरल्या मग मी विचारलं हे काय दिलंस मला, ती आजीबाई म्हणली पेरूची पान उकळून तो रस दिलाय तुला, ते औषध एकदम भारी निघालं राजेहो, दाढ दुखायची बंद झाली ....

एक सुंदर खार दिसली, तिचा फोटोही टिपला, सुर्यास्त होत आला होता ,अद्यापही काय मोठं दिसलं नव्हते, त्यामुळं मी चिंतेत होतो, ही फेरी फुकट जातेय का अशी शंका बळावत होती,

मचाण खोलीच्या जवळच होते, सातला थोडावेळ मचाणावर चढून बसलो
कुटुरगा तर नेहमीचा ,साडेसातला सगळे आवाज अचानक थांबले, जंगलातला एक विशिष्ठ पक्षी 'रातवा' याचा आवाज यायला लागला, त्याचे कापू कापू  रात्रभर सुरू होते.बाहेर कट्यावर बसलो असताना चंद्रप्रकाश माझ्या पायावर आला, तोच समोरच्या झाडावरून एक काळी आकृती खाली उतरताना पाहिली, मी ओळखले शेकरु, महाराष्ट्राचा राज्यप्राणी, काल पहिल्यांदाच पाहिला तो ही अंधारात....मग दोन शेकरुंची झटापटी सुरू झाली
खाली उतरून जेवायला आलो, जेवलो जरा बसलो आणि कॅमेरा सेट करून मचाणावर जाऊन बसलो,
मला दूरवर डोळे चमकत असलेले दिसले, म्हणलं हे काहीतरी वेगळं आहे, असं कधी पाहिलेलं नाही, फ्लॅश मारायचा की नाही याचा विचार करत होतो तेवढ्यात शेजारच्या मचाणावरन एक लोकल मुलगा म्हणला घुबड आहे ते दादा , आधीच घुबड आपला आवडीचा विषय मग मचाणावरून उतरलो, जरा पुढे गेलो आणि फ्लॅश टाकून फोटो घेतला , काय सॉलिड दिसत होतं राव घुबड , त्याला बघून 'दिल गार्डन गार्डन होगया' ना एकदम...
मग मचाणावर येऊनत थोडा पडलो, दरम्यान  एक रानडुक्कर शेजारून गेले.बारा एक वाजले असतील
पूर्ण जंगलात चंद्राचा प्रकाश पडला होता, चांदण्यात न्हाऊन निघणं काय असत ते मला त्यावेळी समजलं, त्यावेळच्या दृश्याला कशाचीच सर नाही, हुमा घुबडाचा आवाज अधून मधून येत होता, रात्रभर अधून मधून जाग येत होती, सकाळी चारच्या सुमारास थंडीने थोडी हूडहुडी भरली पण नंतर बरं वाटलं.

उजाडलं तो सीन तर अप्रतिम होता, निरनिराळ्या पक्षांचे आवाज येत होते, पक्षांचे जणू संगीत संमेलनच भरले होते अशी ही वेळ कधी संपूच नये असं वाटतं. पण वेळ का कुणासाठी थांबते, आठ वाजता खाली आलो , फ्रेश झालो , खाली कोयनामाईत जाऊन अंघोळ केली, अंघोळ करून येत असताना चमत्कार झाला , ज्याची मी एवढ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो, तो गवा मला समोरच्या तीरावर  दिसला ,समोर साक्षात गवा उभा होता , त्याची नी माझी नजरानजर झाली मध्ये पाणी होते , मोबाईल बरोबर होता पटकन एक फोटो घेतला, पुन्हा थोडावेळ भटकंती केली त्यामध्ये अचानक गव्यांचा कळप दिसला , दिवस उजडल्या उजाडल्या सार्थकी लागला.. बाकी वाघोबा साहेब काही दिसले नाहीत. तेवढी एक रुखरुख लागून राहिली...
अशाप्रकारे गणनेचा हा कोयनेतला पहिला अनुभव छान होता, मचाणावर बसायची दुसरीच वेळ..
अनेक नव्या प्राण्यांना भेटलो, अनेक जुन्या प्राणीमित्रांना नव्याने भेटलो.. एकंदर जीवन ह्या अनुभवाने थोडं अजून समृद्ध झालं.भावी  आयुष्यातल्या एका संध्याकाळी हा प्रसंग मला नक्कीच आनंद देऊन जाईल...
समर्थांनी तर म्हणलंयचं
मना रे जनी, मौनमुद्रा धरावी
कथा आदरे राघवाची करावी
नसे राम ते धाम सोडोनी द्यावे
सुखालागी आरण्य सेवीत जावे....

©गौरीश देशपांडे
ह्या लेखाबरोबर फोटोसुद्धा जोडत आहे






No comments:

Post a Comment

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...