Thursday, 31 May 2018

प्रिय पाटणला लाभलेला निसर्ग
आज मी हे दुसरं पत्र लिहितोय, हे पाटणच्या निसर्गा तुझ्याशी मी  एकरूप झालोय,मधल्या काळात एवढं काही घडून गेलं की ते सगळं मनात साचून राहिलं.तुझ्याशी बोलण्याचा धीर होत नाही आहे म्हणून पत्रातून व्यक्त व्हायचा छोटा प्रयत्न करतोय. तू समजून घेशील ही आशा आहे किंबहुना तू आजवर समजूनच घेत आलायस पण त्याबदली आम्ही मानवांनी तुला काय दिलं.. ' बेसुमार जंगलतोड, अवैध शिकारी, पर्यटनाच्या नावावर तुझ्या पोटात निर्माण केलेले रिसॉर्ट ... यादी मोठी होईल.. आपल्या भागाला निसर्गाचं वरदान लाभलंय  पण ते टिकवून ठेवायला हवं ना , आपण करंटे संवर्धन सोडा तो निसर्ग कसा कमी होईल याचीच योग्य काळजी घेतोय..मी काय माझ्या सारखे इतर भटके सुट्टीच्या दिवशी , सुट्टी नसेल तर कामातून रजा काढून तुला भेटायला येतात, तुझ्या अंगा-खांद्यावर बागडतातत.मध्ये एखादा प्राणी दर्शन देतो मग त्याचे फोटो वगैरे घेतले जातात.निसर्गराजा तू आम्हाला सदैव देत आलायस मात्र आम्ही कोडगे तुझे उपकार घेण्याच्या लायकीचेच नाही.
काल ओझर्ड्यासारखा धबधबा माझ्यापुढे मोकळा झाला, त्याच्या डोळ्याच्या कडा तो प्रसंग सांगताना पाणावल्या.भरल्या डोळ्यांनी तो बोलू लागला आणि काठावर बसून मी ऐकू लागलो.. म्हणाला की तुझ्यासारखेच 4-5 जण आले होते काल; मला वाटलं येतील मला पाहतील, पाण्यात थोडे डुंबून जातील पण कसले काय ; त्यांनी मोठ्या आवाजात गाणी लावून नाचायला सुरुवात केली त्यामुळं आजूबाजूचं अरण्य हादरून गेलं.त्या बघ तिकडे दारूच्या बाटल्या पडल्यात.त्या दारूच्या पडलेल्या बाटल्यांकडे बघून मन सुन्न झाले.डोक्यात संतापाची तिडीक गेली पण मी तरी काय करू त्याच अवस्थेत घरी परतलो.
पर्यटनाच्या नावाखाली पैसे उकळून निसर्गात नको ते उपदव्याप करणाऱ्या लोकांची संख्या आता वाढत आहे.हे निसर्गाला आपल्या बापाचा माल समजतात आणि लोकांना आकर्षित करतात.शिवरायांच्या पराक्रमाचा  साक्षीदार असलेला दातेगड सहलींचे ठिकाण होतो तिथंच भविष्यात काय होणार आहे या सगळ्याची प्रचिती येते..उलटा धबधब्याची सुद्धा बऱ्यपैकी तीच अवस्था.जी गत उलट्या धबधब्याची तीच गत कास पठारावर असलेल्या दुर्मिळ फुलांची.. लोकं एक फुल पाहायला मधली फुलं तुडवत जातात, एक दिवस या सगळ्याचा वीट येऊन ती फुलचं इथून निघून जातील .
दुःख तरी किती सांगायचं ? अशी उदाहारणे द्यायची जर ठरवले तर एक वही भरेल आख्खी!! तु म्हणशील  की चांगल्या गोष्टी घडतायेत की नाही? नक्कीच घडतायेत!! अनेक संस्था निसर्ग संवर्धन करण्यासाठी पुढे येत आहेत.स्थानिक लोकांकडून निसर्ग समजून घेऊन तो वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत पन त्यांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे,पण बदल घडतोय,थोडा हळू असला तरी निसर्ग संवर्धन, प्राणी संवर्धनासाठी नक्कीच मदत देणारा असेल.समाजात वाईट प्रवृत्ती खूप आहेत पण चांगल्या प्रवृत्ती जरी थोड्या असल्या तरी चिरकाळ टिकणाऱ्या आहेत.
तूर्तास इथेच थांबतो तुझे आशिर्वाद असेच पाठीशी असुदेत
@गौरीश देशपांडे

No comments:

Post a Comment

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...