आज खूप दिवसांनी घरी आलो.घरी काही कामे होती ती केली जसं की गणपती जवळ आल्याने गणपती ठरवणे त्यातलंच एक काम होतं खरेदी…
आई ऑफिसवरून घरी आली मग थोडावेळ आईबरोबर गप्पा मारल्या मग आई म्हणाली जरा काम आहे घरगुती सामानाची खरेदी करून येऊ !
आईला म्हणलं, चालतय मग मी व आई गाडीने आमच्या इथल्या आपला बझार या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये गेलो. आईने भलीमोठी,मला कंटाळा येईतोपर्यंत खरेदी केली.
झालं एकदाच सगळं शेवटी,मग बिल भरलं आणि त्या पॉईंटला मी बाहेर आलो..
बाहेर एक लहान मुलगा दिसला,त्या मुलाचा चेहरा मी आयुष्यभर नाही विसरणार,चेहऱ्यावर विलक्षण तेज, डोळ्यात एक प्रकारची चमक, अंगावर मळलेले कपडे आणि त्यातून उठून दिसणारा तो मुलगा.. कुणाला तरी शोधत होता बहुतेक
त्याने काऊंटरवर विचारलं पण त्याच्या त्या वेषाने त्याला तिथं कुणी थांबवून घेतलं नाही. तो शेजारच्या दुकानात गेला तिथेही अगदी तसाच अनुभव..मग तो तिथेच थांबला , एक दोन मिनिटं विचार केला आणि पुन्हा मी जिथं थांबलो होतो त्या दुकानात आला मला वाटलं पुन्हा काऊंटरवर हुज्जत वैगरे होईल.पण यावेळी तसं काही झालं नाही.तो तिथं फक्त उभा राहिला. तो मुलगा अगदी घायकुतीला आला होता,त्याच्या तोंडावरून ते समजत होतं. मला असं काही बघितलं की जाम कळवळून येतं, अगदी वाईट वाटतं. मी तोंडावर,फेसबुकवर, व्हाट्सएप स्टेट्सवर अगदी कितीही निष्ठुर दिसत असलो, कितीही पाषाणहृदयी वाटलो तरी तो फक्त आभास आहे.माझे जे जवळचे लोक आहेत त्यांना माझी हळवी बाजू पूर्णपणे माहिती आहे.साहजिकपणे मी पुढं त्या मुलाकडे गेलो,काउंटरवाला ओळखीचा असल्याने म्हणाला,साहेब नका काही विचारू त्याला, रोजची कटकट आहे त्याची,..
मी त्या काउंटरवल्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं,आणि मुलाकडे गेलो.त्याला बोलतं करण्यासाठी पाणी हवं आहे का ? चहा वगैरे हवा आहे का इत्यादी गोष्टी विचारल्या पण तो छोटा फक्त मानेने नको म्हणत होता…
मग तो शांततेचा फुगा मीच फोडला, विचारलं कुणाला शोधतोय ..
तेवढ्यात काऊंटरवरचा इसम म्हणाला, साहेब त्याला काय विचारताय ? त्याच्या बापाला शोधतोय तो ;
त्याचा बाप इथं हमाल म्हणून काम करतो..मगाशी त्याला पगार दिला,आता गेला असेल नेहमीच्या दारूच्या अड्ड्यावर हिणकस स्वरात दुकानदार म्हणाला.
मी त्या मुलाकडे पाहिलं,त्याच्या डोळ्यात पाणी होतं,भरलेले त्याचे ते डोळे काहीतरी सांगत होते, काहीतरी अगम्य गोष्ट,जी त्याने भोगलीये,नियतीने त्याला भोगायला लावलीये. अखेर त्याला शेजारील बेकरीत घेऊन गेलो, तिथं काय खाणार विचारलं, त्याने काचेला हात लावून त्याने त्याला हवा असलेला पदार्थ दाखवला.मी बेकरीवाल्याला तो द्यायला सांगितला. त्याने तो अधाशासारखा संपवला.आणखी घेणार का मी विचारलं तो मानेनेच हो म्हणला.अशा रीतीने त्याने दोन पॅटिस खाल्ले.मग तो जरा बोलायच्या स्थितीत आला. मी चौकशी सुरू केली.त्यातून असं समोर आलं की
त्याचं नाव सूरज, बाप इथं हमाली करतो, आईचा पत्ता नाही.घरी अजून दोन भाऊ आहेत.कालपासून काहीच खाल्लं नव्हतं त्याने. बाप दारू पितो आणि घरी येऊन पोरांना मारतो.तीन दिवसांपूर्वीच घरातलं सामान संपलं तेव्हापासून हा सूरज नुसता भटकतोय.बालमजुरीमुळे कुणी कामावर पण ठेऊन घेत नाही.शाळेबद्दल विचारलं तर वर्षभरापूर्वीच सोडल्याचं समजलं.
पुढे तो म्हणाला बापाचा पगार आज, पैसे मिळाले की तो प्यायला जाईल म्हणून त्याला थांबवायला मी आलोय पण बाप कुठं दिसत नाहीये, नाहीतर पुन्हा दोन भाऊ आज उपाशी राहतील.. मी हे ऐकून उडालोच तेवढ्यात त्याचे वडील त्याला दिसले तो त्यांच्याकडे धावत सुटला… वाटलं की त्याला थोडे पैसे द्यायला हवे होते, पण वेळ निघून गेली होती.
माझ्या मनात त्याच्याविषयी करुणा आणि कौतुक एकाचवेळी दाटलं.
वय अवघं 10 / 12
एवढ्या वयात या कोवळ्या लेकराला इतकी समज कुठून आली असेल.ही परिस्थिती काय काय भोगायला लावते लोकांना. आपण मोठ्या घरात राहतो, ऐशोरामात जगतो पण असे कित्येक सूरज आपल्या आजूबाजूला परिस्थितिशी, समाजाशी लढत असतात,त्यांनी न केलेल्या पापांचे भोग भोगत असतात पण ना आपल्याला फिकीर असते ना समाजाला ना सरकारला..
आपण कल्पना करत नाही एवढ्या यातना लोक दररोज भोगत असतात आणि ही नियती हे सगळं गिळून टाकते निगरगट्टपणे.. एवंढया सहज की त्याच्या असण्याने किंवा नसण्याने दुनियेला काही फरकच पडत नाही
पण फरक पडेल
एक दिवस फरक नक्की पडेल
जेव्हा ह्या सगळ्यापुढं का ? असा प्रश्न हे असंख्य सूरज विचारतील ना तेव्हा फरक पडेल पण
तेव्हा मात्र आपल्याकडे उत्तरचं नसेल….
@गौरीश
@गौरीश
No comments:
Post a Comment